How to Get selected in DEFENCE services


सैन्याधिकारी निवडतात तरी कसे ?
छान भवितव्य, साहसी जीवन, उत्कृष्ट राहणीमान, उच्च दर्जाची देशसेवा, ट्रेनिंगच्या कालावधीत मिळणार विद्यावेतन; शैक्षणिक दर्जा उंचावण्याची सुसंधी आणि अतिशय आकर्षक वेतन अशा अनेक कारणासाठी भारतातील लक्षावधी तरुण-तरुणी सैन्याधिकारी बनण्याचे स्वप्न पहात असतात! त्यांच्या पालकांचे हे तेच स्वप्न असते, पण!
पण, सैन्याधिकारी बनणं जरी ‘अशक्य’ नसलं तरी ते अवघड आहे हे मात्र निश्चित! ही सर्वोत्कृष्ट संधी सर्वांनाच मिळत नाही त्यासाठी अपार कष्ट करायची तयारी, मनाची एकाग्रता झोकून देण्याची तयारी आणि मित्रांनो अभ्यासाची पक्की बैठक असण्याची गरज आहे! हे सर्व करणं जरी ‘सहजसाध्य’ नसलं तरी ‘सर्वसामान्य मुला-मुलींना’ही जमण्यासारखं आहे! आजपर्यंत सैन्याधिकारी बनलेल्या इत्यादी तरुण-तरुणींनी हे सिध्द केलं आहे, म्हणूनच हे तुम्हालाही जमू शकेल!
आपण प्रथम एन.डी.ए.च्या प्रवेश प्रक्रियेची ओळख करुन घेऊ या.
• एन.डी.ए. आणि एन.ए. (नॅशनल अकॅडमी) साठी १२ वीची परीक्षा पास झालेल्या कोणीही तरुण या निवड प्रक्रियेसाठी पात्र असतो.
• एन.डी.ए.ची परीक्षा दोन पातळ्यावर होते. या परीक्षा यू.पी.एस.सी आयोजित करते.
पहिली चाचणी – लेखी परीक्षा
दुसरी चाचणी – मुलाखत
लेखी परीक्षा –
अ) ही परीक्षा दोन विषयांसाठी घेतली जाते.
i) गणित आणि ii) सर्वसामान्य क्षमता
ब) प्रत्येक विषयाची परीक्षा २ तास ३० मिनिटे चालते
क) गणिताची परीक्षा ३०० गुणांची असते आणि सर्वसामान्य क्षमतेची परीक्षा ६०० गुणांची असते.
ड) या परीक्षेतील प्रश्नाचे स्वरुप ‘ऑब्जेक्टीव’ असते आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय दिलेले असतात. त्यातील योग्य पर्याय निवडायचा असतो. प्रत्येक अचुक उत्तराला दोन गुण दिले जातात.
ई) दोन्ही विषयांच्या प्रश्न पत्रिका हिंदी आणि इंग्रजी भाषेत छापलेल्या असतात.
फ) लेखी परीक्षेत निवड होण्यासाठी कमीत कमी किती गुणांची आवश्यकता हे परीक्षा आयोग ठरवत असते.
मुलाखत –
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. या मुलाखती सर्व्हिस सिलेक्शन बोर्डातर्फे (एस.एस.बी) घेतल्या जातात.
१२ वीची परीक्षा पास झालेल्या आर्मी आणि नेव्हीसाठी उत्सुक असलेल्या मुलांना, “बुध्दिमत्ता चाचणी, व्यक्तिमत्व चाचणी द्यावी लागते. पण एअरफोर्ससाठी उत्सुक असणाऱ्या मुलांना याशिवाय पायलट अप्टिट्यूड टेस्टला बसावे लागते.
मुलाखतीमध्ये बुध्दिमत्ता आणि व्यक्तिमत्व यांची चाचणी केली जाते.

बुध्दिमत्ता आणि व्यक्तिमत्व चाचणी :
या मुलाखती दोन स्तरावर आयोजित केल्या जातात. त्यातील पहिला स्तर पास करणाऱ्या मुलांनाच दुसऱ्या स्तरावर जाण्याची संधी दिली जाते.
i) स्तर पहिला :
यामध्ये बुध्दिमत्ता चाचणीचे वर्गीकरण केले जाते. (ऑफिसर इंटिलिजन्स रेटिंग- ओ.आय.आर) त्यासाठी काही चित्रं काही सेकंदासाठी एका पाठोपाठ दाखवली जातात त्यावरुन मुलांची आकलन शक्ती (परसेप्शन) चा स्तर आणि वर्णन शक्तीचा स्तर (डिस्क्रिप्शन) याची चाचणी घेतली जाते. आणि त्यावरुन मुलांची निवड केली जाते. (शार्ट लिस्टिंग)
ii) स्तर दुसरा : यामध्ये मुलाखत, ग्रुप टास्क, मानस शास्त्रीय चाचणी इत्यादींचा समावेश असतो. दुसऱ्या स्तराची चाचणी चार दिवस चालते. या चाचणीच्या पाहणीसाठी, मुलाखत घेणारा अधिकारी, ग्रुप टेस्टींग अधिकारी (जी.टी.ओ.) आणि मानस शास्त्रज्ञ यांची कमिटी नेमली जाते. यातील कोणत्याही एक प्रकारच्या चाचणीत वेगळे गुण दिले जात नाहीत. पहिली चाचणी, दुसऱी चाचणी यातील प्रत्येक मुलाच्या गुणवत्तेचा विचार एकत्रितपणे केला जातो आणि त्यावरुन निवड झालेल्या मुलांची शिफारस केली जाते.
एअरफोर्ससाठी जाणाऱ्या मुलांना एकदाच पायलट अप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागते. त्यात निवडलेल्या गेलेल्या मुलांना वर उल्लेख केलेल्या मुलाखतीच्या चाचणीतून जावे लागते!

शार्ट सर्व्हिस कमिशन मिळण्यासाठी कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर मुलगा/ मुलगी कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिस (सी.डी.एस.) परीक्षेसाठी बसू शकतो. त्या परीक्षेची निवड प्रक्रिया कशी असते, याची चर्चा पुढच्या लेखात करु या!

Leave a Reply

Required fields are marked*