Career In Defence – The rewarding Career

सैन्यदल : एक ओजस्वी कारकीर्द
कोणत्याही ध्येयाने प्रेरित झाल्यामुळे जर तुम्हाला भारताच्या सैन्यदलात ऑफिसर म्हणून भरती व्हायचं आहे! मग ते ध्येय ही आपल्या देशाची हाक असेल किंवा स्वत:च्या अंतरात्म्याचा तो आवाज असेल. त्यासाठी सैन्यात कसं भरती व्हायचं हे समजावून घेणे गरजेचे आहे. सैन्यात ऑफिसर म्हणून भरती होण्याचे दोन मार्ग आहेत.
पर्मनंट कमिशन :
हा मार्ग तुम्हाला निवृत्त होईपर्यंत सैन्यदलात ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी देतो. त्यासाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एन.डी.ए.), आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून किंवा ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी या संस्थांत प्रशिक्षण घ्यावं लागतं.
प्रमोशन्स :
सैन्यदलातील पहिल्या तीन रॅंकस् या कालबध्द असतात. म्हणजे लेफ्टनंट म्हणून दोन वर्ष नोकरी केली की ‘कॅप्टन’चा हुद्दा प्राप्त होतो. आणि कॅप्टन म्हणून १३ वर्षे नोकरी केली की ‘मेजर’ हा हुद्दा दिला जातो. त्यापुढचं म्हणजे लेफ्टनंट-कर्नल, कर्नल, ब्रिगेडिअर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल हे हुद्दे माञ कालबध्द नाहीत. त्यासाठी निवड चाचणी मध्ये उत्तीर्ण व्हावं लागतं. त्यासाठी किती जागा उपलब्ध आहेत याचा विचार केला जातो. म्हणजेच हे हुद्दे, पाञता आणि उपलब्धता यावर अवलंबून असतात.
शार्ट सर्व्हिस कमिशन :
कोणत्याही शाखेच्या पदवीपाञ तरुण-तरुणीला सैन्यात भरती होण्याचा हा दुसरा मार्ग आहे. ऑफिसर ट्रेनिंग युनिट (ओ.टी.एस) मध्ये १८ महिन्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ५ वर्षांसाठी तुमची ऑफिसर म्हणून निवड केली जाते. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पर्मनंट कमिशन साठी प्रयत्न करु शकता किंवा सैन्यदलातून निवृत्तही होऊ शकता. हे सर्व छान आहे. त्यात धाडस आहे, राष्ट्रसेवा आहे, वर्दीचा अभिमान आहे, जनसामान्यात सन्मान आहे हे खरं आहे पण या सर्वांमुळे “पापी पेट” भरत नाही नां! म्हणून आपण बघू या या नोकरीतून पगाराशिवाय आणखी कोणते फायदे मिळतात ते.

• क्वार्टर्स (निवास व्यवस्था) फ्री!
• फ्री रॅशन !
• क्लब आणि कोणत्याही संस्थेच्या सभासदत्वासाठी अनुदान!
• उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा!
• ‘आर्मी ग्रुप’ आयुर्विमा!
• वाहनासाठी आणि घर बांधणीसाठी अत्यल्प व्याजात निधीची उपलब्धता!
• प्रतिवर्षी ६० दिवसाची रजा आणि २० दिवसाची किरकोळ रजा!
• देशांतर्गत प्रवासासाठी ‘वॅस्ट’ (मोफत प्रवास परवाना)!
हे सर्व फायदे आर्थिक निकषावरचे आहेत पण या शिवायचे फायदे, जे कायम स्वरुपात आपल्याला जन्मभर उपयोगी पडतात, ते खालीलप्रमाणे आहेत.
• एन.डी.ए.मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्यांना बी.ए./ बी.एस्सी./ बी.सीएस या पदव्या प्रशिक्षणांच्या काळातच प्राप्त होतात.
• निवड झालेल्या अधिकाऱ्यांना उच्चशिक्षणासाठी पूर्ण पगारी रजा दिली जाते. (अभ्यास रजा)
• वरची रॅंक मिळवलेल्या सैन्याधिकाऱ्यांना ‘मॅनेजमेंट कोर्सेस’ उपलब्ध करुन दिले जातात.
हे सर्व फायदे मिळत असतानाच आपल्याला पगारही मिळत असतो, पण बहुतेक वेळा तो खर्च करण्याची गरजच भासत नाही, कारण उच्च दर्जाचं जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व साधन-सुविधा सैन्यदल आपल्याला “फ्री ऑफ चार्ज” देत असतात! पण तरीही हा किती पगार असतो? विशेषत: ७व्या आयोगानंतर काय परिस्थिती आहे ते बघू या?

रॅंक लेव्हल पगार (रुपयांमध्ये)
१) लेफ्टनंट १० ५६,१००-१,७७,५००
२) कॅप्टन १०() ६१,३००-१,९३,९००
३) मेजर ११ ६९,४००-२,०७,२००

या पुढची प्रमोशन्स ही कालबध्द नसतात त्यामुळो त्याचा विचार करायला नको! पण जर स्वप्नच बघायचं असलं तर आपण लेफ्टनंट जनरल पदाचा पगार बघू या! दरमहा २,२५,००० (फिक्स्ड) ! आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स त्यांचे रॅंक पे सारखेच असतात.

हे सर्व फारच ‘गुडी-गुडी’ आहे. पण ते मिळण्यासाठी कोणते ‘अग्निदिव्य’ पार करावे लागते म्हणजेच एन.डी.ए. किंवा आय.एम.ए. किंवा ओ.टी.एस मध्ये प्रवेश मिळण्याची प्रक्रिया कशी असते याचा विचार पुढच्या लेखात करुया.

Leave a Reply

Required fields are marked*